ठाणे : जिल्ह्यातील गांवपाडे, खेड्यांमध्ये ‘माझी वसुंधरा, अभियान’चा चाैथा टप्पा ग्राम पंचायतींनी हाती घेतला आहे. या अभियानांर्गत पंचतत्व लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या ४३१ ग्रामपंचायतीमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेणारा ठरावही घेण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीत वायु प्रदुषण व ध्वनी प्रदुषण प्रतिबंध होण्यास मदत होईल. याशिवाय पर्यावरण व जनहितार्थ संरक्षण करण्यासाठी उत्तम कार्य ग्रामपंचायतींव्दारे हाती घेण्यात आले आहे.
दिवाळीतील वायु प्रदुषण लक्षात घेता ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ हा टप्पा ग्राम पंचायतींकडून गावाेगावी जात आहे. त्यास अनुसरून सर्व ग्रामपंचायतींना फटाके वापर कमी करून पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे. वायु, जल, आकाश, पृथ्वी, अग्नी या पंचतत्वानुसार पर्यावरणास हानी होणार नाही, याची काळजी या दिवाळीतही ग्राम पंचायतींकडून घेतली जात आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग करून घेतला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेण्यासह विविध उपक्रम या ‘माझी वसुंधरा, अभियान ४.०’ या माध्यमातून वेळोवेळी राबविण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सोलार पंप, वृक्षलागवड, बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल युज प्लास्टिक बंदी असे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. यासाटह पर्यावरण दूत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाेगांवी जनजागृती करत आहेत.