ठाणे : काजूवाडी येथील ठाणे महापालिका शाळेच्या छताचा काही भाग शुक्रवारी कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. दुरुस्तीसाठी २२ लाखांचा खर्च करूनही हा प्रकार घडल्यामुळे शिक्षण समिती सभापती नरेश मणेरा यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.ठाणे महापालिकेच्या १४२ शाळा असून, या शाळांमध्ये ३९ हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. अनेक इमारती जुन्या असून, त्यांचे डागडुजीचे काम पालिकेकडून केले जात आहे. काजूवाडीमध्ये मराठी माध्यमाची शाळा क्र. ९५ आणि शाळा क्र. १३० तसेच हिंदी माध्यमाची शाळा क्र. १३१ भरते. या शाळेच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले. दुरुस्तीच्या अवघ्या काही दिवसांतच शाळेच्या छताचा काही भाग कोसळला. ही घटना घडली तेव्हा विद्यार्थी प्रसंगावधान राखत इमारतीतून बाहेर पडले. ज्यामुळे सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेने येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह पालिकेच्या अभियंत्यांनीही गेल्या दोन दिवसांत घटनास्थळी भेटी दिल्या. सध्या या शाळेत फरशी बसविण्याचे काम सुरू असून, शाळा क्र. ९५च्या छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळल्याचे ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या गटाधिकारी संगीता बामणे यांनी सांगितले. या शाळेत मुख्याध्यापिकेसह २२ शिक्षक आणि सुमारे ७५० विद्यार्थी आहेत. (प्रतिनिधी)
शाळेच्या छताचा भाग कोसळल्याप्रकरणी चौकशी
By admin | Published: June 29, 2015 2:25 AM