ठाणे - थीम पार्क आणि बॉलीवुड पार्कच्या मुद्यावरुन गुरुवारी मागच्या महिन्यात दिवसभर चर्चा होऊन या संदर्भात चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु एक आठवडा उलटून गेल्यानंतरही ना ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्या ना समिती अद्याप गठीत झाली. त्यामुळे आता चौकशी होणार का? की इतर प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणही इतिहास जमा होणार अशी चर्चा मात्र सुरु झाली आहे. घोडबंदर भागातील नवीन ठाणे जुने ठाणे (थीम पार्क) च्या मुद्यावरुन मागील महिन्यात झालेल्या महासभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड केली होती. दिवसभर चर्चा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानंतर जे सत्य बाहेर येईल त्यानुसार संबधीतावर कारवाई केली जाईल असाही निर्णय घेण्यात आला होता. तसेच या संदर्भातील ठरावही करण्यात आला होता. परंतु हा ठराव करतांना त्यावर तत्काळ स्वाक्षºया करुन समिती गठीत करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केली होती. दुसरीकडे थर्ट पार्टी आॅडीटही करण्याचे निश्चित झाले होते. तर प्रशासनाने जे जे स्कुल आॅफ आर्ट मार्फत येथे बसविण्यात आलेल्या साहित्याच्या वस्तुस्थिती तपासली जाणार होती. परंतु त्याचेही पुढे काय झाले याचे उत्तरही अद्याप मिळू शकलेले नाही.दरम्यान मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात यावर चर्चा झाल्यानंतर एक आठवडा उलटूनही ना ठरावाचा थांगपत्ता लागलेला आहे, की त्यावर स्वाक्षºया सुध्दा झालेल्या नाहीत. आमच्याकडे ठराव आल्यानंतरच आम्ही समिती गठीत करु शकतो. परंतु अद्यापही तो प्राप्त झाला नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे चर्चा केली असता, समिती अद्याप गठीत झालेली नाही. प्रशासनाला त्या अनुषंगाने सांगण्यात आले आहे. परंतु ठरावाचे काय झाले याचे उत्तर मात्र त्यांचेकडे नव्हते. एकूणच इतर प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणावरसुध्दा अचानक पडदा पडतो की काय अशी चर्चा मात्र जोर धरु लागली आहे.
जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 5:32 PM
थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही.
ठळक मुद्देआठवडा उलटूनही समिती गठीत नाहीचौकशी बारगळणार