जितेंद्र कालेकर, ठाणेबिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चौघाही नगरसेवकांच्या मालमत्तेची, तसेच बँक खात्याचीही चौकशी केली जाणार आहे. परमार यांनी या चौघांपैकी कोणाला पैसे अथवा इतर स्थावर मालमत्तेचा व्यवहार केला आहे का? याबाबतचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.सध्या न्यायवैद्यक अहवालातून ज्यांची नावे उघड झाली, त्या सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या चौघांचीही कार्यालये आणि निवासस्थानातून काही महत्त्वाची कागदपत्रे, तसेच बँक खात्यांचा तपशीलही तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. यातून या चौघांपैकी कोणी त्यांच्याकडून पैसे किंवा इतर काही स्थावर मालमत्ता घेतली आहे का? तसे असेल, तर त्याचा तपशील योग्य आहे? तसेच या चौघांच्याही संपत्तीचा मार्ग आणि त्यांची सध्याची संपत्ती याबाबतही सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परमार यांच्या ‘सुसाइड नोट’नुसार राजकीय नेत्यांना पैसे दिले, तरी कामे होत नव्हती, असाही उल्लेख आहे. लोकसेवकाने भ्रष्टाचार केल्याचे संकेत यातून मिळाल्यामुळेच त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचाही गुन्हा नोंदविला आहे. भादंवि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा ही दोन्ही कलमे असल्यामुळेच ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला.आज जामीन अर्जावर सुनावणीचौघांचाही जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने २९ आॅक्टोबर रोजी फेटाळल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या अर्जाचीही सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
‘त्या’ नगरसेवकांच्या मालमत्तेची आणि बँक खात्यांंचीही चौकशी
By admin | Published: November 02, 2015 2:52 AM