भिवंडी : भिवंडी-वाडा-मनोर या ६२ किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी रविवारी या रस्त्याची पाहणी केली. तसेच, या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची रस्त्यावरच झाडाझडती घेत रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचे बजावले.
बीओटीच्या माध्यमातून विकसित केलेल्या या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती याेग्यरीत्या न केल्याने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ताब्यातून काढून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला आहे. नदीनाका ते अंबाडी हा भाग भिवंडी व पुढील रस्ता वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येताे. पहिल्या पावसातच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघातही हाेत आहेत. याबाबत अनेक तक्रारी आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडी ते वाडा या रस्त्याची पाहणी केली. यावेळी स्थानिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर हे खड्डे मुरूम मातीने न बुजविता पावसात चिखल होऊन रस्ता निसरडा होणार असल्याने ते काम तत्काळ थांबवून येत्या आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजविण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. या रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.
काेट
नदीनाका ते अंबाडी या भिवंडी विभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे हे तेथील ग्रीडने समतल केले जात आहेत. विशेष बाब म्हणून डांबर प्लांट सुरू करून या रस्त्यावरील खड्डे लवकर भरले जातील.
- सचिन धात्रक, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग