मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी शनिवारी शहरातील विविध कामांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी विकासकामांची पूर्तता वेळेत करण्यासह अतिक्रमण हटवणे, साफसफाई आदी जबाबदाऱ्या काटेकोरपणे पाळा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दर आठवड्याला कामांचा आढावा आयुक्त घेणार आहेत.
आयुक्तांच्या आढावा दौऱ्यात पालिकेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित, उपअभियंता नितीन मुकणे, यतीन जाधव, कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे, उत्तम रणदिवे, तांत्रिक सल्लागार मुग्धा पत्की आदी सोबत होते. आरक्षण क्रमांक २४१ मधील अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, आरक्षण क्र. २४६ मधील मैदान विकसित करणे व या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागेची पाहणी, आरक्षण क्र. २३३ मध्ये व्यायामशाळा बांधणे, आरक्षण क्र. २४३ मध्ये तरणतलाव बांधणे, आरक्षण क्र. २४५ मध्ये पार्किंग सुविधा तयार करणे या कामांच्या जागेची पाहणी केली.
आरक्षण क्र. २३० मधील बुद्ध विहार व मेडिटेशन सेंटर, उर्दू शाळाचे बांधकाम, काशिमिरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन कलादालन, महाजनवाडी येथील नाट्यगृह, लोढा ॲमिनिटी स्पेसमधील तरणतलाव व व्यायामशाळा इमारत, घोडबंदर किल्ला सुशोभीकरण, घोडबंदर काँक्रीट रस्ता, जेसल पार्क चौपाटीवरील कामे, भाईंदर पश्चिमेच्या कमला पार्क कम्युनिटी हॉल, घोडबंदर ६० मीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, घोडबंदर तलाव व पद्मावली तलाव साफसफाई करणे याबाबत कामांची पाहणी करून सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सुरू असलेली विकासकामे मुदतीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एकदा प्रत्येक कामाची पाहणी व बैठक घेऊन कामांना गती देणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.
---------------------------------------
अतिक्रमण हटविण्याबाबत दिल्या सूचना
पाहणीदरम्यान आरक्षण जागेवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे काढणे, रस्त्यावरील डेब्रिज व माती, कचरा उचलणे, झाडांच्या फांद्या उचलणे याबाबत संबंधित स्वच्छता निरीक्षक व उद्यान अधीक्षक यांना आदेश देण्यात आल्याचे पालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.