लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरस्तरावर ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. तसेच रेल्वेस्थानकांवर श्वान पथकाकडून तपासणी सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः सुरक्षा तपासणी करीत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षा दलाच्या श्वान पथकाने शुक्रवारी कल्याण स्थानकात कसून तपासणी केली. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण दक्षता बाळगली जात आहे. रेल्वे फलाट, स्वच्छतागृह, पादचारी पूल, तिकीटघरांचे हॉल, उपाहारगृह, कचरा टाकण्याचे डबे यासह येणाऱ्या मेल, लोकल गाड्या तसेच संशयास्पद व्यक्तींवर बारीक नजर ठेवली जात आहे. दरम्यान, सुरक्षेच्या संदर्भात शोधमोहिमेचा भाग म्हणून महिला सुरक्षारक्षकही तैनात असल्याचे दिसले.
--------------