उल्हासनगर - कोरोना काळात महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे उभारलेले २०० बेडचे रुग्णलाय गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्या रुग्णालयाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत पाहणी करून उद्घाटनाचे संकेत दिले.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, आरोग्य सुविधे बाबत शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. कोरोना काळात महापालिकेने दरमहा २२ लाख भाडेतत्त्वावर एक खाजगी रुग्णालय घेतले होते. अश्या संकट समयी स्वतःचे रुग्णालय हवे म्हणून तत्कालीन आयुक्त डॉ राजा दयानिधीं व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या संकल्पनेतून रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे रुग्णालय उभारून कोट्यवधीच्या निधीतून महापालिकेने साहित्य खरेदी केले. तसेच रुग्णालय प्रांगणात स्वतःचा ऑक्ससिजन प्लॅन्ट उभारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल असे वाटत होते. गेल्या आठवड्यात लोकार्पण सोहल्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या भाषणात उडघटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णालयाचे लवकरच उदघाटन होणार असल्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री यांच्या संकेतानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिका रुग्णालयाची पाहणी केल्याचे बोलले जात आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी रिजेन्सी अंटेलिया येथील महापालिका रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी रुग्णालया बाबत खासदार यांना माहिती दिली. रुग्णालयाच्या पाहणी नंतर खासदार शिंदे यांनी लवकरच रुग्णालयाच्या उडघटनाचे संकेत दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयाची साफसफाई सुरू करण्यात आली असून काही यंत्रसामग्री आणण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची जमवाजमव महापालिका आरोग्य विभागाने सुरू केली. याबाबत आयुक्त अजीज शेख, आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.