ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या सुशोभिकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामांची शनिवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पाहणी केली.
आनंदनगर चेकनाका, कॅडबरी जंक्शन, तीन हातनाका तसेच एलबीएस मार्ग भागात त्यांनी दाैरा केला. यावेळी पावसामुळे रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा, माती तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तत्काळ उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागास दिले. दरम्यान, एलबीएस मार्गावरील रस्तेदुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेव्हरब्लॉक पद्धतीने तत्काळ रस्ता तयार करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. यावेळी उपआयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, सहायक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, कार्यकारी अभियंता चेतन पटेल आदी उपस्थित होते.