मोखाडा : जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले व खळ्यावर आणून ठेवलेले पीक पूर्णपणे भिजले आहे. त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने बुरशी येऊन पिकांचे दाणे काळे पडत आहे. त्यामुळे ते वाया जाण्याची भीती आहे. यामुळे आता धान्याऐवजी शेतकऱ्यांच्या हाती गवताचा पेंढाच राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जव्हार तसेच मोखाडा भागात खरीप हंगामात भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद यासारखी पिके घेतली जातात व यंदा या पिकांचे उत्पादनही चांगले आले होते. त्याचप्रमाणे याच पिकावर शेतकरी आपल्या कुटुंबाची वर्षभराची गुजराण करत असतो, त्यामुळे काही पिकांची विक्र ी करून उर्वरित पीक हे स्वत:च्या वापरासाठी ठेवले जाते. मात्र, सद्य:स्थितीत कापणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने घात केला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. त्यामुळे या परिसरातील बळीराजा हाताश झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने आदिवासींची सोसायटी व खावटी कर्जे माफ करावीत.- बाबुराव दिघा, चेअरमन, आदिवासी विविध कार्य सहकारी सोसायटी, मोखाडा
तांदळाऐवजी यंदा हाती पेंढाच
By admin | Published: November 30, 2015 2:11 AM