लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरला मुबलक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होत असला तरी शहरातील खाजगी रुग्णालयांना आजही ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. हीच परिस्थिती बदलापूरमधील खाजगी केअर सेंटरची झाली आहे.
अंबरनाथमधील कोविड केअर सेंटरमध्ये ४०० बेडचा ऑक्सिजन कक्ष उभारण्यात आला असून, या ठिकाणी दररोज १.६ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. या ठिकाणी आणखी २०० बेड वाढविण्यात येणार असल्याने भविष्यात अंबरनाथ नगरपालिकेला ४ टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे, तर बदलापूरमध्येही ३ टन ऑक्सिजनची गरज भासणार असून, त्या अनुषंगाने दोन्ही नगरपालिकांनी ऑक्सिजन स्टोरेज प्लांट उभारला आहे. या प्लांटच्या मदतीने ऑक्सिजनचा साठा करून ठेवता येणार आहे. गेल्या वर्षी कोविडच्या काळात अंबरनाथ नगरपालिकेला अर्धा टनपेक्षा कमी ऑक्सिजन लागत होता. त्या काळात ऑक्सिजन बेडची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने आता अंबरनाथ नगरपालिकेला दररोज १.६ टन, तर बदलापूर नगरपालिकेला सरासरी १ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. बदलापूर नगरपालिकेचा ऑक्सिजन पुरवठा अनियमित असल्याने काही वेळेस अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न बदलापूर पालिकेने केला असून, आता अखंडित ऑक्सिजन पुरवठा होत आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या कोविड केअर सेंटरला मुबलक ऑक्सिजन उपलब्ध होत असताना शहरातील खाजगी कोविड हॉस्पिटलला मात्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सींना ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणे शक्य होत नाही. त्यामुळे अंबरनाथमधील सिटी हॉस्पिटलसारख्या मोठ्या रुग्णालयांनाही ऑक्सिजनअभावी रुग्ण हलवण्याची वेळ आली होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्याने नियमित ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे.
---------------------
बदलापूर पालिकेची जबाबदारी वाढली
बदलापूर पालिकेतील रुग्णालयासोबतच खाजगी रुग्णालयांनाही वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बदलापूर पालिकेची जबाबदारी दुपटीने वाढली आहे.