लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकासमोर एसटी बस डेपोची पाच एकर जागा असून, तेथे डेपो, प्रशासकीय इमारत आणि कार्यशाळा आहे. या बस डेपोतून एसटी तसेच कल्याण-डोंबिवली (केडीएमटी) आणि नवी मुंबई महापालिका (एनएमएमटी) परिवहन सेवांच्या बस सुटतात. या डेपोत लालपरीच्या बस शिस्तीने उभ्या राहतात. मात्र, केडीएमटी व एनएमएमटीच्या बससाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे या बससाठी प्रवासी गर्दी करतानाचे चित्र पाहावयास मिळते.
एसटी डेपोमध्ये १० फलाट आहेत. पहिल्या फलाटावरून पडघा, मुरबाड, भिवंडी येथे जणाऱ्या बस सुटतात, तर नाशिक, धुळे, जळगाव येथे जाणाऱ्या बस त्यानंतर उभ्या केल्या जातात. त्यांच्या शेजारच्या फलाटावर नगर, कोल्हापूर, पुणे, अलिबाग, कोकणातील गाड्या उभ्या असतात. कार्यशाळेला लागून पालघर, जव्हाण, वाडा, बोईसर येथे जाणाऱ्या बस उभ्या केल्या जातात. डेपोतील कार्यशाळेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवेशाकडे भिवंडीची विनावाहक बस उभी केली जाते, तर डेपोच्या मागच्या बाजूला लागून कल्याण-मलंगगड, कल्याण-तळोजामार्गे पनवेल या बस उभ्या केल्या जातात.
डेपोच्या उर्वरित भागात केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बस उभ्या केल्या जातात. डेपोत सकाळ व सायंकाळी गर्दीच्या वेळी बसची संख्या जास्त असते. त्यामुळे त्यावेळी बस उभ्या करण्यासाठी अडचण होते. एसटी बस शिस्तीत फलाटावर येतात. मात्र, केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बस उभ्या करण्यासाठी अपुरी जागा असल्याने तेथे बस उभ्या करताना बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. बस सुटेल या भीतीपोटी तसेच जागा मिळविण्यासाठी प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करतात.
-------
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
१. बस कधी येणार, याची माहिती डेपोतील डिस्प्ले बोर्डवर लावली जाते. तसेच डेपोतील नियंत्रण कक्षातून बस कुठे लागली आहे, याची बसच्या नंबरसह उद्घोषणा केली जाते. तरी देखील प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करतात.
- संपत देवगिरे
२. मी रोज कल्याण ते नवी मुंबई, पनवेलच्या दिशेने प्रवास करतो. बस डेपातील अपुऱ्या जागेत बस लावल्या जातात. त्या महापालिकेच्या बस आहेत. त्यामुळे त्याठिकाणी प्रवाशांची गर्दी होते. बसमध्ये चढण्यासाठी गर्दीचा सामना करावा लागतो.
- बाळा चंदनशिवे
---------------------
आगार प्रमुखाचा कोट
बस डेपोची जागा पाच एकर आहे. त्यात पालिकांच्या परिवहन सेवेच्या बससाठीही जागा दिलेली आहे. एसटी बस शिस्तीत उभ्या केल्या जातात. मात्र, अपुऱ्या जागेमुळे पालिका परिवहनच्या बस उभ्या करण्यासाठी अडचणी आहेत. केडीएमसी स्मार्ट सिटी अंतर्गत डेपोचा विकास करणार आहे. त्यावेळी ही समस्या संपुष्टात येऊ शकते.
- विजय गायकवाड, एसटी डेपो व्यवस्थापक, कल्याण.
---------