ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांची रखडलेली वेतनवाढ त्वरित देण्यात यावी, ठाणे विभागातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विश्रांती व स्वच्छतागृहांची अवस्था सुधारावी, एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था करावी, आदी प्रलंबित प्रश्नांवर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक आक्रमक झाली असून, ठाणे विभागीय अध्यक्ष सचिन शिंदे यांनी हे प्रश्न लवकर मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गुरुवारी दिला आहे.
कळवा कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढ टाळेबंदीमधील गैरहजेरीचे कारण देत प्रशासनाने दोन महिने पुढे ढकलली आहे, त्या नियमित कराव्यात, दैनंदिन गाडी दुरुस्तीच्या कामकाजासाठी लागणारे सुटे पार्ट्स उपलब्ध करावेत, खात्यांतर्गत लेखनिक पदासाठी पात्र झालेल्या चालक, वाहक, यांत्रिक पदाच्या कर्मचाऱ्यांना त्वरित लिपिक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. पालघर, मुंबई व रायगड विभागात या नियुक्त्या झालेल्या आहेत. ठाणे विभागात का नाही, असा सवालदेखील करण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या झालेल्या आहेत, त्यांना झालेल्या बदलीच्या ठिकाणी त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे आदी मागण्या विभाग नियंत्रकांनी ताबडतोब सोडवाव्यात, यासाठी इंटकचे विभागीय सचिव शामराव भोईर यांनी प्रशासनास निवेदन दिले आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर होत नाहीय, गणपती तोंडावर आलेले आहेत. वेळेवर पगार न झाल्यास गणेशोत्सवाच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जुलै, ऑगस्ट महिन्यांचा पगार प्रशासनाने त्वरित द्यावा, अशी मागणी एसटी इंटकने वरिष्ठ पातळीवर केलेली आहे.