- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका महिन्यात शहराचा दुसरा दौरा केला. कलानी महल मध्ये नवनिर्वाचित अध्यक्षा पंचम कलानी यांच्यासह पक्ष पदाधिकारी, पप्पु कलानी व ओमी कलानी यांच्या सोबत निवडणूक तसेच बांधकामे नियमित करणे, शहर विकास निधी आदी बाबत चर्चा झाल्याची माहिती शहराध्यक्षा पंचम कलानी यांनी दिली.
उल्हासनगरात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे निमित्त गेल्या महिन्या आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, केबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे आदींनी मध्यरात्री कलानी महल येथे भोजन करून बंद दरवाजा आड चर्चा झाली. त्यानंतर दोन दिवसात पक्षाच्या तत्कालीन शहराध्यक्षा सोनिया धामी यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून त्यांची नियुक्ती प्रदेश सरचिटणीस पदी केली. तर पंचम कलानी यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांना ठाणे येथे राष्ट्रवादी पक्षात जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत प्रवेश देऊन, शहाराध्यक्ष पदाची माळ पंचम कलानी यांच्या गळ्यात पडली. पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत इंनकॉमिंग सुरू झाले. महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी कलानी महलला भेट देऊन नवनिर्वाचित शहाराध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली.
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा कलानी महलला भेट दिल्याने, विविध चर्चेला उधाण आले. पाटील यांनी माजी आमदार पप्पु कलानी यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते. पक्षाला पूर्वीचे राजकीय वैभव येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली असून आजी-माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांच्या सोबतही दिर्घ चर्चा करून कामाला लागा. अश्या सूचना यावेळी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याना पाटील यांनी दिल्याचे बोलले जात आहे. पप्पु कलानी यांनी गेल्या काही दिवसात शहर पिंजून काढले असून शहरातील वातावरण कलानीमय केले. कलानी यांचे असेच आकर्षण नागरिकांत राहिल्यास सन २००२ च्या महापालिका निवडणुकी प्रमाणे पक्षाला मोठे यश मिळण्याचे भाकित राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. जयंत पाटील यांनी कलानी महलात दोन तास घालविल्यानंतर, पुढील दौऱ्यासाठी प्रस्थान केले.
सीमा कलानी आमदार पदाच्या उमेदवार?
राष्ट्रवादी पक्षात कलानी कुटुंबाने प्रवेश केल्यानंतर, पंचम कलानी यांच्या गळ्यात शहाराध्यक्ष पदाची माळ पडली. त्या महापौर पदाच्या उमेदवार राहणार असून ओमी कलानी हे पक्षाचे सूत्र स्वीकारणार आहेत. तर सीमा कलानी यांना आमदार पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे संकेत आहेत. माजी आमदार पप्पु कलानी हे महाविकास आघाडीचे समन्वयक व मार्गदर्शनाचे काम करणार असल्याचेही बोलले जात आहे.