ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) त्यांच्या सर्वच प्रकारच्या कर्जांवरील व्याजदरात कपात केली आहे. यामध्ये बाइकखरेदीवर सुमारे ३.५० व फोर व्हीलर वाहनखरेदीवर १.७५ टक्के व्याजदर कमी केला आहे. उर्वरित कर्जांवर सरासरी एक ते अर्धा टक्का व्याजदर कमी केले आहे. बुधवारी झालेल्या बँक संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले.अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक पार पडली. आधीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर बहुतांशी प्रकरणांवर आजपर्यंत निर्णय होऊ शकला नव्हता. त्यात व्याजदर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन टीडीसीसीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याज कमी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या नियमांस अनुसरून घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.यामध्ये मोटारसायकल (बाइक) खरेदीवरील व्याजदर १३ वरून ९.५० टक्के, तर वाहनखरेदीवरील व्याज आता ११.५० वरून ९.७५ टक्के केले आहे. याशिवाय, शैक्षणिक कर्ज मुलांसाठी १० वरून आता ९.५० टक्के, तर मुलींसाठी ९.५० वरून आता ९ टक्के करण्यात आले. पगार तारणावरील व्याजदर १३ वरून १२ टक्के झाला आहे. छोट्या व्यावसायिकांना १२ ऐवजी आता ११ टक्के व्याजादराने कर्ज घेता येणार आहे. व्यावसायिक वाहनखरेदीवरील व्याजदर १२ ऐवजी आता ११ टक्के झाले आहे. घरखरेदी व्याजदर ९.७५ वरून ८.७५ टक्के करण्यात आले. गाळाखरेदीसाठी १०.७५ वरून ९.७५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. याशिवाय, सोने तारणावरील व्याज १२.५० वरून ११.५० टक्के झाले आहे. शेतकऱ्यांसाठी सोने तारणावरील व्याज ११.५० टक्के ऐवजी आता १०.५० टक्के झाले आहे. बचत गटांसाठी देण्यात येणारे कर्ज आता ९.७५ ऐवजी ८.७५ टककयांनी दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले
By admin | Published: April 27, 2017 11:57 PM