ठाणे : ठाणे शहर मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक (आरपीआय) नामदेव शिंदे यांना महिला पोलिसांच्या विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध आणखीही दोन महिलांनी तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिंदे यांनी अटकपूर्व जामिनासाठी यापूर्वीच अर्ज केला आहे. त्याची सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. त्यावर, तपास अधिकाºयांना संपूर्ण सहकार्य करणे, आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आदी अटींच्या अधीन राहून त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायाधीश पी.आर. कदम यांनी शुक्रवारी हा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. २४ जानेवारी रोजी दोन महिला कर्मचा-यांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केला. त्यानंतर, त्यांनी तातडीने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आपल्याशी शिंदे हे गैरवर्तन करून विनयभंग करत असल्याची तक्रार या दोन महिला पोलिसांनी दाखल केली. याच प्र्रकरणात आणखी दोन महिलांनीही त्यांच्याविरुद्ध जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होण्यापूर्वी विशाखा समितीने केलेल्या चौकशीत १० महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या. या सर्वच प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांना २ फेब्रुवारी रोजी निलंबित केले. ठाण्यात नियुक्तीपासूनच महिला पोलीस कर्मचा-यांशी त्यांचे वर्तन असभ्यपणाचे होते. रजा देताना, ठरावीक ठिकाणी ड्युटी देताना त्यांच्याकडून गैरवर्तन केले जायचे, असाही आरोप आहे. वैद्यकीय कारणास्तव रजा घेऊन त्यांनी जरी अटकपूर्व जामिनासाठी धडपड केली असली, तरी हा जामीन फेटाळला गेला, तर मात्र त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाईल, असे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले.
ठाणे मुख्यालयातील आरपीआय नामदेव शिंदेंना मिळाला अंतरिम अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 7:59 PM
दोन महिला पोलिसांचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले नामदेव शिंदे यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देआणखीही दोघींनी केल्या तक्रारी७ फेब्रुवारीला होणार अटकपूर्व जामीनाची सुनावणीपोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार