मीरारोड - स्वच्छ प्रभागाचे बक्षिस जाहीर करत नाहीत, डेंग्यूने मृत्यु झालेल्या मुलीच्या प्रश्नावर उत्तर नाही, स्वत:ची सेटींग करुन निघून जातात, आम्ही काय फक्त ठरावांवर हातच वर करायचे का ? असे एकापाठोपाठ एक घणाघाती हल्ले भाजपाच्या नगरसेवकांनी स्वपक्षीयांवरच केल्याने भाजपातील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. या नगरसेवकांनी आयुक्तांचीही झाडाझडती घेत संताप व्यक्त केला.आज शनिवारच्या महासभेनंतर २०१७-१८ च्या स्वच्छता सर्वेक्षणातील विजेत्या प्रभागांची नावं व पुरस्कार जाहीर केली जातील अशी खात्री भाजपाचे प्रभाग ५ मधील नगरसेवक मुन्ना उर्फ श्रीप्रकाश सिंग यांना होती. परंतु महापौर डिंपल मेहतांनी सभा तहकूब करत त्यांच्यासह उपमहापौर निघून गेले. त्याचवेळी आयुक्त बालाजी खतगावकरसुद्धा सभागृहातून बाहेर पडत असताना संतापलेल्या मुन्ना यांनी त्यांना अडवत विजेत्या प्रभागांची नावं जाहिर का केली नाहीत याबद्दल जाब विचारला. मुन्ना यांनी आयुक्तांशी चढ्या आवाजात बोलण्यास सुरवात केल्याने आयुक्त तिथून निघून गेले.यानंतर मुन्ना यांच्यासह भाजपा नगरसेवक अशोक तिवारी यांनी आयुक्तांना बोलावून नावं जाहीर करत नाहीत तोपर्यंत बाहेर जााणार नाही असे म्हणत ठिय्या दिला. त्यामुळे नगरसेवक मदन सिंग, नगरसेविका वंदना मंगेश पाटील, माजी महापौर गीता जैन आदी सर्व गोळा झाले.यावेळी वंदना पाटील यांनी संताप व्यक्त करत, डेंग्यूने मुलीचा मृत्यू झाला त्यावरदेखील उत्तर दिले नाही. फक्त ठराव संमत करण्यासाठी हात वर करायला सांगतात, असा संताप व्यक्त केला. तर कामांची वाट लागली आहे. पूर्वी कामं व्हायची. आज कामं होत नाहीत, अशा शब्दांमध्ये अशोक तिवारी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.मुन्ना सिंग यांनी तर, सर्व आपल्या परिने सेटींग करुन आणि मनाला वाटलं तेव्हा सभा तहकूब करुन निघून जातात. त्यांची कामं झाली की झालं. सर्व मिळालेले आहेत. पाणी नाही, औषधं नाहीत. पण करोडो रुपये खर्च होत आहेत. आधी २४ तासांची कपात असायची आता ३० तास झाली. आठवड्यातून दोन दिवस पाणी मिळते. लोकांना आम्हाला उत्तरं द्यावी लागतात. सत्ता पचवता येत नाही, असे त्यांनी महापौरांसह स्वपक्षाच्या नगरसेवकांना सुनावले.सभापती रवी व्यास, गीता जैन, ध्रुवकिशोर पाटील यांनी समजूत घातल्यावरही सिंग व तिवारी ऐकण्यास तयार नव्हते. अखेर उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना पाचारण करण्यात आले. पानपट्टे यांनी शासनाकडून नावं अंतिम झाली नसल्याचं सांगत समजूत काढल्यानंतर हे नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले. या भाजपा नगरसेवकांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे स्थानिक भाजपा नेतृत्वाची पंचाईत झाली आहे. पक्षात सर्वकाही आलबेल नसून अंतर्गत असंतोष या निमित्ताने उफाळून आला आहे.