मीरा रोड : भाईंदर शिवसेनेतील अंतर्गत वादंग रविवारी शिवसेना शाखेत उफाळून आला. घाणेरड्या शिव्या दिल्यावरून महिला शिवसैनिकाने शहरप्रमुखास मारले व काळे फासले. तर, त्या झटापटीत ती शिवसैनिकही जखमी झाली आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भाईंदर पोलीस ठाण्यासमोरच शिवसेनेची शाखा आहे. रविवारी दुपारी माजी शहर संघटक वेदाली परळकर या महिला बचत गटाबाबत काही महिलांना घेऊन शाखेत गेल्या होत्या. तेथे शहरप्रमुख पप्पू भिसे हे खुर्चीवरून उठून बाहेर गेले असता वेदाली त्या खुर्चीवर बसल्या. भिसे यांनी ते पाहिले व खुर्चीत बसण्यावरून वेदाली यांना शिवीगाळ सुरू केली. घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणून भिसे यांना जाब विचारला व त्यावरून भांडण थेट हातघाईवर आले. शाखेच्या बाहेरही वेदाली व अन्य काही महिलांनी भिसे यांना मारायला सुरुवात केली. यात वेदाली यांच्या हातावरही जखमा झाल्या आहेत. भाईंदर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बाजारातच हा शिवसेनेचा राडा झाल्याने एकच गर्दी झाली होती. वेदाली यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी भिसे यांच्यावर विनयभंगासह मारहाण व जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भिसे यांनीही वेदालीसह अन्य सहा ते सात महिलांवर एकत्र मिळून मारल्याची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिसे यांनी काही जणांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात शनिवारी केला होता. तेव्हा महिला पदाधिकाऱ्यांना न बाेलावल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा आराेप भिसे यांनी केला.
पाेलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरणशिवसेनेतील या राड्यानंतर विरोधी पक्षनेते धनेश पाटील, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक राजू भोईर, विक्रमप्रताप सिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलीस ठाणे परिसरात गर्दी केली होती. यामुळे पोलीस ठाण्याबाहेरही दोन गटांत तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पाेलिसांनी त्यांना तंबी हुसकावून लावले.
दरम्यान, या घटनेची शहरात चर्चा सुरु होती. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी येथील सामान्य शिवसैनिकांनी केली आहे. अंर्तगत वाद उफाळून आल्याने भविष्यात याचे परिणाम दिसू लागतील असे येथील राजकीय निरीक्षकांचे मत आहे.