ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रमेश धुमाळ, मुकूंद हातोटे आणि सुनिल पाटील या तीन सहायक पोलीस आयुक्तांची इतरत्र बदली झाल्यानंतर ठाण्यात इतर जिल्हयातून दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील कळवा विभागामध्ये सुनिल घोसाळकर तर गुन्हे अन्वेषण विभागामध्ये भगवान गवळी यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी दिले आहेत.गुन्हे अन्वेषण विभागाचे बाजीराव भोसले, वर्तकनगर विभागाचे महादेव भोर, आर्थिक गुन्हे शाखेचे शांताराम अवसरे आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे अविनाश मोहिते चार सहायक पोलीस आयुक्त निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागा रिक्तच होत्या. मोहिते मार्च २०१९ त्यापाठोपाठ भोर आणि अवसरे हे एप्रिलमध्ये तर भोसले हे मे महिन्यात निवृत्त झाले होते. त्यानंतर कळवा विभागाचे रमेश धुमाळ आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे मुकूंद हातोटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर अंबरनाथच्या सुनिल पाटील यांची लोहमार्ग विभागामध्ये अलिकडेच बदली झाली होती. त्यामुळे ठाण्यातील दहा सहायक पोलीस आयुक्तांच्या जागा या रिक्त होत्या. १२ ते १९ जुलै या काळात इतर जिल्हयातून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात दहा एसीपींची बदली पोलीस महासंचालक कार्यालयातून झाली. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून आलेल्या किसन गवळी यांना आता गुन्हे अन्वेषण विभागात तर कळवा विभागात धुमाळ यांच्या जागी राज्य सुरक्षा महामंडळातून आलेल्या घोसाळकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चंद्रपूर येथून बदली झालेले सरदार पाटील, अंबरनाथ विभागात विनायक नरळे तर वाहतूक शाखेत अमरावती ग्रामीणमधून आलेल्या अविनाश पालवे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. याशिवाय, दत्ता तोटेवाड यांना प्रशासन, मानस संसाधन विभागामध्ये दिलीप उगले, कल्याण वाहतूक शाखेमध्ये दत्तात्रय निघोट यांना संधी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ठाणे शहर मुख्यालय दोन साठी उमेश माने, भिवंडीच्या वाहतूक शाखेमध्ये संजय शिंदे, ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये दीपक बांदेकर आणि नामदेव बजवळे यांची विशेष शाखेत नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.