ठाणे : विकासात्मक धोरणासोबतच क्रीडा क्षेत्रातही ठाण्याचा नावलौकिक होण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये नवीन कोर्ट मॅट्स, आकर्षक रंगरंगोटी व एलईडी लाइटच्या साहाय्याने अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट बनवण्यात आले आहे.
यापूर्वी येथे खेळाडूंना वूडन कोर्टवर तसेच कमी प्रकाशझोतात सराव करून राष्ट्रीय स्पर्धेत उच्च प्रकाशझोतात मॅट्सवर खेळावे लागत होते. परंतु, आता आंतरराष्टीय दर्जाचे कोर्ट तयार करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अॅकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्यासह १५ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह १५० खेळाडू कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सराव करत आहेत.
ठाणे महापालिकेने कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय पद्धतीचे बनवलेले बॅडमिंटन कोर्ट देशासाठी एक मानबिंदू ठरणार असून अनेक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय खेळाडू सय्यद मोदी बॅडमिंटन अॅकॅडमीमधून तयार होतील, याची खात्री आहे.- श्रीकांत वाड (प्रशिक्षक)वूडन कोर्टवर सराव करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मॅटवर खेळताना त्रास होत होता. आता या सर्व अद्ययावत मॅट्स व लाइटमुळे सराव करणे सोपे झाले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वातावरण आता ठाण्यात निर्माण झाले आहे.- अमन संजय (राष्ट्रीय खेळाडू)देशातील अव्वल अशा गोपीचंद अकादमीच्या धर्तीवर कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टवर सुविधा देण्यात आल्या असून या अद्ययावत मॅट्सवरील सरावाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खूप फायदा होणार आहे.- व्ही. हारिका (राष्ट्रीय खेळाडू)