ठाणे : वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृतीसाठी ठाणे महापालिकेने बुधवारी वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणाकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करून ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस’ साजरा केला.
यावेळी परिवहन समिती सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, प्रादेशिक परिवहन विभागाचे विश्वेश्वर शिंदे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, सीनिअर केमिस्ट राजू जाधव, विद्या सावंत, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.कोकणे, औद्योगिक विभागाचे संचालक रोहित मिलन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच परिवहनसेवेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
हवा प्रदूषणाशी निगडित महत्त्वाचे घटक, वाहतूक प्रदूषण, औद्योगिक उत्सर्जन, डीजी सेट आणि वीटभट्ट्या, बायोमास, पीक, कचरा जाळल्याने होणारे उत्सर्जन, तसेच बांधकाम व तोडफोड कचऱ्यामधून होणारे धूळ प्रदूषण, वाहनांची निगा व देखभाल, पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, लेन ड्रायव्हिंग, तसेच सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, ‘माझी वसुंधरा अभियान २०२०’ अंतर्गत हरित शपथेचे वाचनही करण्यात आले.
---------------