लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अभिनय कट्ट्यावर दरवर्षी विविध क्षेत्रात चमकमदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात येतो. अभिनय कट्टा रणरागिणी पुरस्कार हा समाजातील महत्वाचा पुरस्कार मानला जातो.यंदा कोरोनाचं सावट असल्याने सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करून केवळ पुरस्कारप्राप्त माऊलींना व्यासपीठावर निमंत्रित करून हा सन्मान देण्यात आला. या वर्षीच्या या पुरस्काराचे महत्व म्हणजे समाजातील दुर्लक्षित अशा सुईणींचा तसेच आई व लहान बाळांची मालिश करण्याचं अतिशय महान कार्य गेली अनेक वर्षे करत असणाऱ्या या माऊलींचा सन्मान.
निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या यासुरेखा संजय भोसले, भारती रमेश शिर्के, सविता सुभाष वांडकर, विटाबाई बाबाजी शिंदे,निर्मला पांडुरंग पवार,शोभा बाळकृष्ण साळुंखे ,स्मिता मनोज सालीयन,मंगला गणेश जाधव,राधा हनुवती मालुसरे,बाईजाबाई शिरपत म्हस्के,अनुसया सुदाम आंब्रे,ज्योती मारुती सुंभे सर्व माऊलींना अभिनय कट्टा रणरागिणी पुरस्कार २०२१ या मानाच्या पुरस्काराने दिव्यांग कला केंद्र संचालिका संध्या नाकती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.गेल्या कित्येक वर्षांपासून ते आजच्या कोरोनाकाळातसुद्धा नौपाडा विभागातील या सर्व माऊलींनी केलेली हि सेवा म्हणजे समस्त ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.यांचा सन्मान करताना समस्त ठाण्यातील या क्षेत्रात सेवा देणाऱ्या सर्व माऊलींना अभिनय कट्ट्यातर्फे मानाचा मुजरा असे मत अभिनय कट्ट्याचे संचालक व पुरस्काराचे आयोजक किरण नाकती यांनी व्यक्त केले.