ठाणे : मानवाच्या मेंदूला अंगभूत चटक लावण्याचा गुणधर्म या पदार्थांमध्ये असतो. व्यसनांमध्ये तंबाखू, दारू, चरस, गांजा, अफू, मावा, कोकेन अशा पदार्थांचा समावेश असतो. परंतु, आजच्या युवा पिढीला आणि अगदी बालवयात विळख्यात पकडणारी नवीन व्यसने आहेत, ती म्हणजे इंटरनेट, मोबाइल, पॉर्न, गेम्स, शिवीगाळ. जाणते-अजाणतेपणी लहान मुले या विळख्यात ओढली जात आहेत. त्यामुळे वेळ हाताबाहेर निघून जाण्याआधी किंवा मुलांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाय शिक्षक व पालकांनी करावे, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक डॉ. सुनील कर्वे यांनी दिला.
मातृसेवा फाउंडेशनतर्फे ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’अंतर्गत गुरुवारी व्यसनांचा विळखा आताच ओळखा, हा संवादात्मक कार्यक्रम महापालिका शाळा क्रमांक ५५, ५०, १३३ येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमात १० ते १५ वयोगटांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यसन नावाचा राक्षस हा गाडून टाका. या व्यसनांत मुले अडकली असतील, तर त्यांनाही मदत करा, असे मार्गदर्शनपर वक्तव्य डॉ. कर्वे यांनी केले. त्यांनी पुढे बोलताना व्यसनाधीनता म्हणजे काय, विविध व्यसने आणि शरीरावर त्याचा परिणाम आणि त्यांच्या आहारी का जाऊ नये, अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. व्यसनाधीनता हा ज्वलंत विषय असून युवा पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. त्यासाठी जनजागृती हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, असे त्यांनी सांगितले.व्यसनांचा अर्थच संकटसंस्थेच्या अध्यक्षा संध्या सामंत म्हणाल्या की, व्यसन एक मानसिक विकार आहे. व्यसन हा एक संस्कृत शब्द आहे आणि मुळात त्याचा अर्थच ‘संकट’ असा आहे. त्या पुढे म्हणाल्या, मोबाइलने आपल्याला लांबच्या माणसांशीही जोडले हे खरं आहे, पण आसपासच्या माणसांपासून तोडले हे नाकारता येणार नाही. या स्मार्ट फोनच्या लाटेत वाहवत जायचे की, स्मार्टपणे त्याचा वापर करायचा, हे आपले आपणच ठरवायचे आहे.