लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : जेष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून, हातचालाखीने फसवणुक करुन, सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चार आरोपींच्या सराईत आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीकडून पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि श्रीराम करांडे यांनी गुरुवारी दिली आहे.
टाकी रोडवरील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या जेसी रॉड्रीक्स (५९) यांची १२ ऑक्टोबरला संध्याकाळी बतावणी करून फसवणूक केली होती. त्या घटनेच्या दिवशी चेतन बार ते केएमपीडी कॉलेजच्या रोडवर असताना त्यांना रस्त्यात दोन आरोपी भेटले होते. आरोपींनी त्यांना त्यांच्याजवळील ५ लाख रुपयांचे कागदी खोटे बंडल देऊन त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची चेन खोटी बतावणी करून फसवणूक केली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पोलीस आयुक्तालयात गेल्या काही दिवसांपासून जेष्ठ नागरीकांना बोलण्यात गुंतवून अशाच प्रकारे बतावणीचे गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचना च आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीनने सुरु केला. दरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच बातमीवरुन आरोपी शंकर राय (३७), मंगल सिलावट (३७), सचिन राठोड (२२) आणि राजुराव राय (२५) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपास केल्यावर दोन गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांतील फसवणूक झालेले सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे साडे चार तोळे वजनाचे सर्व सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी सध्या विरार पोलीस ठाण्याचे पोलीस कोठडीमध्ये आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.