ठाणे : "आमचा प्रेमविवाह झालाय आणि आमची पहिली भेट ग्रंथालयातच झाली." अशी आठवण ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल ठाण्यात 'चांदणंं संमेलनात' सांगितली.
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेने सुमारे दोन दशकांनंतर पुन्हा नव्याने 'चांदणंं संमेलन ' हा रसिकांचा आवडता कार्यक्रम सुरु केला आहे. रात्री ९.३० वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम पहाटे ६.०० वाजेपर्यंत अधिकाधिक रंगत गेला. संमेलनाची सुरुवात मंचावर चांदण्या उजळून करण्यात आली. त्यानंतर नुपुर नृत्यालयाच्या कलाकारांनी नृत्याविष्काराने नांदी सादर केली. यानंतर नरेंद्र बेडेकर यांनी मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यात महापौर नरेश म्हस्के तसेच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, व ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर सपत्निक सहभागी झाले. वाचनाचा व पुस्तकांचा काय परिणाम तुमच्यावर झाला या प्रश्नाचे उत्तर देताना जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी अनेक किस्से सांगितले. "झाडाझडती" पुस्तक वाचल्यामुळे शेतक-यांवरील कठोर कारवाई मी थांबवली अशी ह्रुद्य आठवण राजेश नार्वेकर यांनी सांगितली. तर मुलांमध्ये वाचनाची व साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी पालकांनीच प्रयत्न केला पाहिजे असे विवेक फणसळकर यांनी सांगितले. नरेश म्हस्के यांनी साहित्य आणि वाचन यामुळेच मी घडलो याची कबुली दिली. याच कार्यक्रमात ठाण्यातील नवोदित वादकांच्या वादनाचा कार्यक्रम सादर झाला. यात सतार, व्हायोलिन, बासरी, हार्मोनियम वादन सादर केले गेले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात धनश्री लेले यांचा शब्दमोती हा कार्यक्रम रसिकांना अतिशय भावला. पहाटे पहाटे अमोल देशमुख, अरुण म्हात्रे यांनी गझल कार्यक्रमातून रंगत आणली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या चांदण्यात रसिक न्हाऊन निघाले.