सुरेश लोखंडेठाणे : शहरातील कोपरी परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाशांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ते पात्र की अपात्र, याच्या शोधासाठी सध्या ठाणे महापालिकेत मुलाखती सुरू आहेत. परंतु, बीएसयूपीनंतर एसआरडीए आणि आता एसआरए ही योजना झोपडपट्टीवासीयांच्या घरांसाठी राबवली जात आहे. तरीदेखील, महापालिकेकडून या मुलाखती घेतल्या जात असल्यामुळे जाणकारांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.
बीएसयूपीनंतर शहरात ‘झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण’ (एसआरडीए) हा प्रकल्प राबवण्यात आला. त्यातही गोंधळ होऊन पात्र रहिवाशांना डावलल्याच्या तक्रारी होत्या. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी मागील दोन वर्षांपासून महापालिकेच्या एसआरडीएऐवजी आता झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण अर्थात ‘एसआरए’ हा स्वतंत्र विभाग शासनाने सुरू केला. त्याचे संपूर्ण कामकाज ठाणे शहरातून होण्याऐवजी अजूनही बांद्रा येथून सुरू आहे. याद्वारे एक हजार ५२४ एकरच्या भूखंडावरील २६५ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होत आहे. तरीदेखील बीएसयूपीच्या घरांसाठी पात्र उमेदवारांचा शोध घेऊन यादी तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेकडून अद्याप सुरू आहे.
शहरात बीएसयूपीनंतर एसआरडीए आणि आता एसआरए स्कीम सुरू आहे. पण, रहिवाशांच्या तक्रारीस अनुसरून बीएसयूपीच्या घरांसाठी तयार केलेल्या यादीतून पात्र व अपात्र रहिवाशांचा त्यांच्याकडील पुराव्यास अनुसरून शोध घेतला जात आहे. ठाणे महापालिका उपायुक्तांकडून त्यांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. यामुळे या मुलाखतींविरोधात तर्कवितर्क काढणे योग्य नसल्याचे ठाणे महापालिका समाजविकास विभागाचे अधिकारी दशरथ वाघमारे यांनी लोकमतला सांगितले.
एसआरएची कामे तीन विभागांतशहरातील एक हजार ५२४ एकरवर या २६५ झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. एसआरए प्रकल्पासाठी पात्र झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची कामे तीन भागांत विभागली आहे. यातील पहिल्या विभागात चेंदणी, कोपरी, ठाणे, माजिवडा, पाचपाखाडी या परिसरातील झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. तर, माजिवडातील पाटीलपाडा, चितळसर, मानपाडा, बाळकुम, ढोकाळी, ओवळा, कासारवडवली, बोरिवडे, कावेसर, मोघरपाडा, भार्इंदरपाडा आणि येऊर या दोन्ही विभागांत प्रकल्पांची कामे सुरूही झाली आहेत. कळवा, खारी, पारसिक, मुंब्रा, कौसा, सोनखर, दिवा, सावे, आगासन, दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, डोमखार, डावले, देसाई, सागर्ली, पडले, डायघर, खिडकाळी आणि शीळ आदी ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा तिसऱ्या विभागात समावेश आहे. त्यांना एसआरएमध्ये समाविष्ट करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणाच्या कामाने जोर धरला आहे.