प्रज्ञा म्हात्रे / ठाणेसकाळी १० वाजल्यापासून मतदान केंद्रांच्या बाहेर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची हळूहळू गर्दी झाली. ठाण्यातील मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू होती. मात्र, जसजसे कल स्पष्ट होत गेले, तसतसे पराभवाच्या छायेतील उमेदवारांच्या समर्थकांनी सुबाल्या केले आणि विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे हवेत नाचवू लागले... गुलालाची उधळण सुरू झाली... एकमेकांना हर्षभराने आलिंगन देत होते... मिठाई भरवत होते... उत्साही कार्यकर्ते कंबर मोडेस्तोवर नाचत होते आणि नाशिकबाजाच्या तडतडाटात सारे ठाणे जल्लोषमय होऊन गेले. गुरुवारी सकाळी ९.३० पासून दुचाकीवरून कार्यकर्ते केंद्रांकडे घिरट्या घालू लागले. सुरुवातीपासून मतमोजणी संथ गतीने सुरू होती. त्यातच, दादोजी कोंडदेव स्टेडिअममधील मतमोजणी तांत्रिक बिघाडामुळे काही काळ थांबवल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दुपारनंतर विजय-पराभवाची वृत्ते पसरू लागली, दिग्गजांना धूळ चारल्याच्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीचा पडदा व्यापू लागल्या, व्हॉट्स अॅपवरील निकालाचे मेसेज वाढू लागले तसा कार्यकर्त्यांचा जमाव वाढू लागला. विजयी उमेदवार जाहीर होताच घोषणांचा वर्षाव सुरू झाला. हातात झेंडे घेतलेल्या बाइकस्वारांचे तांडे सुसाट वेगाने घोषणाबाजी करत फिरू लागले. विजयी उमेदवार मतदान केंद्रातून बाहेर येताच, त्यांना उचलून घेत, हारतुऱ्यांनी त्यांचे स्वागत होत होते. डांबरी रस्ते गुलालाच्या उधळणीने गुलाबी झाले.एकीकडे विजयी उमेदवारांचा जल्लोष काही ठिकाणी उन्मादाची पातळी गाठत असताना, दुसरीकडे पराभूत उमेदवारांचे कार्यकर्ते मान खाली घालून, निराश होऊन केंद्राच्या बाहेर काढता पाय घेत होते. ठाणे क्लब येथे असलेल्या मतदार केंद्राच्या बाहेर महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक १९ मधील आपले चारही उमेदवार जिंकणार, याची खात्री असल्याने भगव्या रंगाच्या साड्या, भगव्या रंगांचे फेटे घालून या महिला तयारीतच आल्या होत्या. जशी चारही उमेदवारांच्या विजयाची घोषणा झाली, तसा त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी विजयी उमेदवार मतदान केंद्रातून बाहेर आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घळाघळा वाहत होते. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या जल्लोषात ‘आवाज कुणाचा? शिवसेनेचा’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण म्हणतंय येणार नाय, आल्याशिवाय राहणार नाय’ अशी घोषणाबाजी सुरू होती, तर भाजपाच्या उमेदवारांच्या विजयी मिरवणुकांत ‘देवेंद्र फडणवीस झिंदाबाद-नरेंद्र मोदी झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा सुरू होत्या. मनसे कार्यालयात शुकशुकाट निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा पक्ष कार्यालयांबाहेर जल्लोष सुरू झाला. विजयी उमेदवार पक्ष कार्यालयास भेट देत होते. भाजपाच्या कार्यालयात संदीप लेले विजयी उमेदवारांचे स्वागत करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार आनंद परांजपे यांच्या भेटीस येत होते. 109 उमेदवार उभे करून एकही जागा न मिळवणाऱ्या मनसेच्या कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. नेत्यांनी कार्यालयात बसून पाहिले निकालसकाळच्या वेळेस काही पक्ष कार्यालयांत नेते होते. काही पक्ष कार्यालयांत मात्र शुकशुकाट होता. काही पक्ष कार्यालयांत दोन-चार कार्यकर्ते होते. शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे टीव्हीवर निवडणूक निकाल पाहत होते. भाजपा कार्यालयात मात्र सकाळपासून सामसूम होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जितेंद्र आव्हाड येऊन गेले, तर शहराध्यक्ष आनंद परांजपे निकालाच्या अंदाजांविषयी बोलत होते.काँग्रेसच्या कार्यालयात बाळकृष्ण पूर्णेकर नसले, तरी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. मनसेच्या पक्ष कार्यालयात अविनाश जाधव हेही टीव्हीवर निकाल पाहत होते.
धाकधूक ते कंबरतोड जल्लोष
By admin | Published: February 24, 2017 7:34 AM