ठाणे : मोहम्मद रफी यांच्या ‘गुलाबी आँखे’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के’, ‘मे यमला पगला दिवाना’ यासारख्या गाण्यांनी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व रसिकांमध्ये धम्माल उडवून दिली. रफी यांची ११५ हून अधिक गाणी २०० हून अधिक हौशी गायकांनी सलग १२ तास सादर करून त्यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे जम्मू, केरळ आणि अलिबाग यासारख्या ठिकाणांहून आलेले गायकदेखील यात सहभागी झाले होते.कोरम मॉल आणि रफीज फॅन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रफी यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात रफी यांच्या फॅनला गाण्याची संधी देण्यात आली. २० ते ४५ वर्षे वयोगटांतील हौशी गायकांनी त्यांच्या पसंतीची रफींची गाणी सादर केली. विशेष म्हणजे यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्यांचे जुन्या गाण्यांवरही तितकेच प्रेम असल्याचे सिद्ध केले. ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘चाँद मेरा दिल’ यासारख्या शेकडो गाण्यांची बरसात रविवारच्या सायंकाळी झाली. काही गाण्यांवर तर प्रेक्षकवर्गात उपस्थित असलेल्यांनी डान्सही केला. जम्मूहून आलेले मनवीर सिंग यांनी ‘बार बार देखो’ हे गीत सादर केले. याच ठिकाणांहून आलेल्या संजय कुमार यांनीही आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर केली. केरळहून आलेले मेहबूब कॅलिकत यांनी ‘तुमसे जुदा होके मर जाएंगे’, ‘आजा तुझको पुकारे मेरा प्यार’ तर अलिबागच्या संदीप सातारे यांनी ‘मस्त बहारोंका मे आशिक’, ‘छु लेने दो’ अशी अनेक गाणी सादर केली. दरम्यान, रफी फॅन क्लबचे सुनील वाडकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ‘आजा रे आ जरा’, ‘ओ हसीना जुल्फो वाली’, ‘आसमाँ से आया फरिश्ता’ ही आणि इतर गीते सादर केली.
रफींची ११५ हून अधिक गाणी सलग १२ तास सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:17 AM