भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका हद्दीत असलेल्या चेना नदी पात्रात गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीर माती भराव होत असताना जिल्हा प्रशासनाचा महसूल विभाग मात्र कागदी घोडे नाचवून याकडे दुर्लक्ष करीत असल्याने माती भरावात सतत वाढ होऊ लागली आहे.काही वर्षांपूर्वी नदीपात्रात विहिरी खोदण्यात आल्या होत्या. शिवाय तत्कालिन आयुक्त सुरेश काकाणी यांनी शहरातील पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून या नदीतील ५ दशलक्ष लीटर पाणी शहरवासियांना पिण्याव्यतिरीक्त उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले होते. चेना गावातील ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी नदीवर सुमारे २२ गाळ्यांचा छोटा पूल बांधला आहे. दोन वर्षांपासून नदीपात्रात बेकायदेशीर माती भराव करण्यात येत असून त्याकडे जिल्ह्याच्या महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यात पुलाच्या दोन्ही टोकांकडील सुमारे ४ गाळे अदृश्य झाले असताना कारवाई होत नसल्याचा गैरफायदा घेत भूमाफीयांनी माती भरावात सतत वाढच केली आहे. यामुळे नदीचे पात्रच अरुंद होऊ लागले असून पुलाचे आणखी गाळे नजरेआड झाले आहेत. पालिकेने जानेवारी २०१५ मध्ये नदी पत्रातील बेकायदेशीर माती भरावाप्रकरणी शौकत खानसह एका अज्ञातावर काशिमिरा पोलिसांत एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु, यावर ठोस कारवाई न झाल्याने भूमाफीयांची वक्रदृष्टी अधिक गडद झाली आहे. याबाबत सजा घोडबंदरचे मंडळ अधिकारी वसंत चौधरी यांनी सांगितले कि, नदीतील बेकायदेशीर माती भरावाप्रकरणी वरीष्ठांना अहवाल पाठविलेला आहे. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतरच मगच काय ती कार्यवाही करण्यात येईल. (प्रतिनिधी)
चेना नदी पात्रात अवैध माती भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2015 10:55 PM