बदलापूर : बदलापूरमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी झालेली गोळीबाराची घटना बनाव असल्याचे समोर आले आहे. या घटनेत स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव करणाऱ्या जगदीश कुडेकर याला परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. लांजा येथून पोलिसांनी कुडेकरला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.बदलापूरमध्ये २ आॅक्टोबरचा दिवस गोळीबाराच्या घटनेने गाजला. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी परिसरात शिवसेनाप्रणित माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या जगदीश याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. मात्र, या हल्ल्यात एकही गोळी मारेकºयांच्या बंदुकीतून सुटली नाही. तसेच जी गोळी सुटली ती हवेत गेली. त्यामुळे या प्रकरणाकडे सुरुवातीपासूनच संशयाच्या नजरेने पाहिले गेले. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असताना नेमका गोळीबार करणारा आरोपी शोधण्याऐवजी पोलिसांनी कुडेकर याच्या साथीदारांवरच लक्ष ठेवले होते. कुडेकर याने गोळीबाराचा बनाव केल्याची शक्यता सुरुवातीपासून पोलिसांना होती. काही दिवसांतच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांच्या विशेष पथकाने विवेक नायडू आणि दत्ता कासोडे उर्फशेलार या दोघांना पिस्तूल आणि काडतुसासह अटक केली होती. अटक केलेल्या या आरोपींना आपल्याला जगदीश यानेच पिस्तूल दिल्याची माहिती दिली. तसेच त्याच पिस्तुलाच्या मदतीने जगदीश याच्या सांगण्यावरून त्याच्यावरच हल्ला करण्याचा बनाव केल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे स्वत:वर हल्ल्याचा बनाव केल्याच्या आरोपावरून जगदीश याचा पोलीस शोध घेत होते. मंगळवारी उशिरा जगदीश रत्नागिरीजवळच्या लांजे गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तिथे जाऊन कुडेकरच्या मुसक्या आवळल्या.स्वत:वर हल्ल्याचा बनाव करून कुडेकरला पोलीस संरक्षण मिळवायचे होते, अशी माहिती आता पुढे येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या जगदीश कुडेकरला काही दिवस पोलीस कोठडीतच काढावे लागणार आहेत.
संरक्षणासाठी हल्ल्याचा खटाटोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:46 AM