ठाणे : जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ यांच्यासह यास्मिन खानच्याही पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाने त्यांना ठाणे न्यायालयासमोर हजर केले. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना सरकारी पक्षाने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचाही संदर्भ दिला.बॉम्बस्फोटांच्या वेळी पाकिस्तानातून मोठा शस्त्रसाठा मुंबईत आला. नईमच्या घरातून हस्तगत केलेला शस्त्रसाठा हा त्यापैकीच एक आहे का, याच्या चौकशीसाठी नईमचा ताबा आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयासमोर केला. यास्मिन खान ही नईमची पत्नी आहे. तीदेखील आरोपी असल्याने दोन्ही आरोपींची रुजवात घालून या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांचा खुलासा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याशिवाय, आरोपींनी शस्त्रे कुठून मिळवली, त्यांचा वापर कधी, कुठे आणि कोणत्या गुन्ह्यांसाठी झाला, याच्या चौकशीसाठीही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती पोलिसांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरून तिन्ही आरोपींना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, नईम खान याला ठाणे कारागृहातून ताबा घेण्याची प्रक्रियादेखील सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे न्यायालयाने त्याच्या हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. आता मुंबई येथील विशेष मकोका न्यायालयाची परवानगी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. ती मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथकास ठाणे कारागृहाकडून नईमचा ताबा घेणे शक्य होईल. गुरुवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन नईमचा ताबा मिळण्याची शक्यता असल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉम्बस्फोटांचे धागेदोरे तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 3:04 AM