ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला. फटाक्यांना घाबरणारा अक्षय पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करूच शकत नाही, असा दावा त्याच्या काकांनी केला, तर अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केली.
नवी मुंबईतील तळाेजा कारागृहात आराेपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई- वडील साेमवारी सकाळी गेले हाेते. मुलाला भेटण्याचे टाेकन त्यांना मिळाले नव्हते. त्यांना दुपारी ३.३० वाजता येण्यास सांगण्यात आले. साधारण ३.४५ वाजता ते गेल्यानंतर अक्षयची आणि त्याच्या आई-वडिलांची २० मिनिटांसाठी भेट झाली. त्यानंतर अवघ्या दाेन तासांनंतर त्याच्या एन्काउंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली. कारागृहातील भेटीमध्ये माझ्यावरील चार्जशीट दाखल झाली. मला कधी साेडविणार? अशी विचारणा त्याने केली. त्याच्या भेटीनंतर ४.४५ वाजता बाहेर पडल्यानंतर पाेलिस चकमकीत ताे मारला गेल्याचे समजले. परंतु, पाेलिसांनी अधिकृतरीत्या काहीच कळवले नाही. या प्रकरणातील सहाजण फरार आहेत. अक्षयवरील गुन्हा सिद्ध झाला नव्हता. म्हणूनच त्याला मारले, असा आराेपही त्याच्या काकांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्याच्या काकांनी केली.
माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा सवालही त्याच्या आईने केला.
बदलापुरात आंदोलन उभ्या करणाऱ्या मनसेच्या संगीता चेंदवाकर, भाजपच्या मीनल मोरे, शिंदेसेनेच्या पूजा टाकसाळकर आणि अजित पवार गटाच्या प्रियंका दामले यांनी नगरपालिका कार्यालयासमोर एकत्र येत एकमेकांना पेढे भरवले.
बदलापूरमध्ये जल्लोष
अक्षय शिंदे याचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाल्याचे समजल्यावर बदलापूरमध्ये फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शिंदेला तातडीने फाशी देण्याची मागणी बदलापूरमधील नागरिकांनी केली होती.