लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील काही दिवस शहरातील अनाधिकृत हॉटेल, पब, हुक्का पार्लरवर कारवाईचा हातोडा टाकण्यात आला. मात्र आता ही बांधकामे उभी असतांना, महापालिकेचे अधिकारी झोपले होते का? तेव्हा कारवाई का झाली नाही, असा सवाल आता मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे अनाधिकृतपणे व्यवसाय करणारे व त्यांना अभय देणारे दोन्ही समान दोषी असल्याने अनाधिकृत हॉटेल, पब आणि हुक्का पार्लरवाल्यांना पाठीशी घालणाºया अधिकाºयांची मागील काही वर्षात वाढलेली संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
पूणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनाधिकृत बार, हुक्का पार्लर आणि पब वाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर मागील आठवड्यात महापालिकेच्या माध्यमातून नऊ प्रभाग समिती अंतर्गत अशा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. परंतु काही ठिकाणी कारवाईत दुजाभाव केल्याचेही उघड झाले आहे. येऊरला कारवाई करीत असतांना केवळ पावसाळी शेडच तोडण्यात आल्या. तर कोठारी कंपाऊंड येथे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत कारवाईला गेलेल्या अधिकाºयांना त्यांच्या खालील अधिकाºयांनी चला जेवणाची सुट्टी झाली म्हणत कारवाईच्या ठिकाणापासून थेट जेवणावळीला नेल्याचे दिसून आले. तर अनेक ठिकाणी केवळ शेड तोडण्यात आल्याचेही दिसून आले.
परंतु आता अशी बांधकामे होत असतांना त्याला आधीच अटकाव का घातला गेला नाही, तेव्हा पालिकेतील अतिक्रमण विभागातील अधिकारी झोपले होते का? असा सवाल पांचगे यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळेस पालिकेतील काही अधिकाºयांनी अशा बांधकामांना पाठीशी घालण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांना पाठीशी घालत असतांना पालिकेतील अतिक्रमण विभागातील काही अधिकाºयांची संपत्ती देखील मागील काही वर्षात वाढली असून त्या वाढीव संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. किंबहुना अतिक्रमण विभागातील अधिकाºयांना स्वत:ची संपत्ती जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावेत अशी मागणी करतांना दोषी आढळल्यास कारवाईची मागणीही केली.