लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका युवकाच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणाचा तपास ठाण्यातील एका बोगस डॉक्टरच्या गळ्यापर्यंत पोहोचला आहे. मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या दुसऱ्याच डॉक्टरचा नोंदणी क्रमांक वापरून राजरोसपणे डॉक्टरकी करणाऱ्या या बोगस डॉक्टरविरुद्ध कळवा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.कळव्यातील प्रीतेश विश्वनाथ कदम (२३) याला जास्त क्रिकेट खेळल्यामुळे अंगदुखीचा त्रास होत होता. किरकोळ आजारपणामुळे कुटुंबीयांनी त्याला याच भागातील आतकोनेश्वरनगरातील डॉ. शशी सूर्यनारायण सुमन यांच्या सत्यम क्लिनिकमध्ये नेले. डॉ. सुमन यांनी प्रीतेशला दोन इंजेक्शन आणि काही औषधे दिली. दुसऱ्या दिवशी प्रीतेशला इंजेक्शन दिलेल्या भागात त्रास सुरू झाला. तरीही, तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. पण, त्रास जास्तच वाढल्याने तो घरी परत आला. सायंकाळी पुन्हा डॉ. सुमन यांच्याकडे गेला. त्यांनी त्याला मलम आणि आणखी काही औषधे दिली. त्यानंतरही त्रास वाढतच गेल्याने कुटुंबीयांनी त्याला महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले. याचदरम्यान प्रीतेशच्या दुर्दैवाने डॉक्टरांनी संप पुकारला होता. अशातच औषधांचे इन्फेक्शन झाल्याने २४ मार्च रोजी प्रीतेशचा मृत्यू झाला. कळवा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, प्रीतेशच्या कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेऊन कळवा पोलीस ठाण्यावर धडक दिली. डॉ. सुमन यांच्या उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी कारवाईची मागणीही केली. कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इर्शाद फकिरोद्दीन सय्यद यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सखोल तपास सुरू केला. संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून डॉ. सुमन याची वैधता तपासण्याचा प्रयत्न उपनिरीक्षक सय्यद यांनी केला. परंतु, फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट मुंबईतील महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तिथे ६०१४७ या डॉ. शशी सुमन यांच्या नोंदणी क्रमांकाची पडताळणी केली असता हा नोंदणी क्रमांक दुसऱ्याच डॉक्टरचा असल्याचे समजले. याच नोंदणी क्रमांकाच्या आधारे बोगस लेटरपॅड, कागदपत्रे आणि शिक्के बनवून हा स्वयंघोषित डॉक्टर आॅक्टोबर २०१५ पासून राजरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची माहिती इर्शाद सय्यद यांना मिळाली. खातरजमेअंती स्वत:च्याच तक्रारीवरून सय्यद यांनी पोलिसांत या तोतया डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. सत्यम की असत्यम...!तोतया डॉक्टर शशी सुमन हा मूळचा बिहारमधील असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक इर्शाद सय्यद यांना तपासादरम्यान मिळाली. त्याच्याजवळ आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या दोन बोगस पदव्या होत्या. पोलीस तपासाची भनक लागल्यानंतर १२ एप्रिल रोजी सत्यम क्लिनिकला कुलूप ठोकले होते. तेव्हापासून त्याचा थांगपत्ता नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत्यूचा तपास पोहोचला बोगस डॉक्टरपर्यंत
By admin | Published: May 06, 2017 5:32 AM