लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने सुरु असून यातील आरोपींची गय केली जाणार नसल्याची ग्वाही ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना दिली. जमील यांच्या भावासह नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी या तपासाची त्यांना माहिती दिली.राबोडीमध्ये २३ नोव्हेंबर २०२० रोजी जमील शेख यांची दिवसाढवळया दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन हत्या केली होती. या खूनाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाकडे पोलीस आयुक्तांनी सोपविला आहे. युनिट एकने या प्रकरणात शाहीद शेख या आरोपीला अटकही केली आहे. मात्र, मुख्य आरोपी उत्तरप्रदेशातून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी युनिट एक तसेच खंडणी विरोधी पथक अशी वेगवेगळी तीन पथकेही उत्तरप्रदेशात गेली होती. मात्र, या तिन्ही पथकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला विशेष काहीच गती आली नव्हती. याचसंदर्भात ११ जानेवारी रोजी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव तसेच जमीलचे भाऊ तुफेल शेख आणि पुतण्या फिरोज शेख आदींनी पोलीस आयुक्त फणसळकर यांची भेट घेतली. त्यावेळी या तपासाला गती आली पाहिजे तसेच योग्य तपास होणे आवश्यक असल्याची मागणी या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. तेंव्हा थेट उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करीत आहे. हा तपास योग्य दिशेने सुरु असून यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच तपास प्रगती पथावर असल्याचेही फणसळकर यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जमील शेख हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 9:41 PM
ठाण्यातील मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने सुरु असून यातील आरोपींची गय केली जाणार नसल्याची ग्वाही ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना दिली.
ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांची ग्वाही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह नातेवाईकांनी घेतली भेट