कल्याण : डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीतील रिअॅक्टरमध्ये सोमवारी सायंकाळी प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाची चौकशी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाचे संचालक विनायक लोंढे म्हणाले की, ‘अंबर कंपनी आॅरगॅनिक पॅराक्झाइड हे रसायन तयार करते. कंपनीला सोमवारी रक्षाबंधनानिमित्त सुटी असल्याने कामगार कामावर नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, कंपनीत शनिवारी रिअॅक्टरमध्ये केमिकलची एक बॅच घेतली होती. त्यापैकी ७५ टक्के रसायन काढले होते. तर, उर्वरित २५ टक्के रसायन हे रिअॅक्टरमध्येच होते. या शिल्लक राहिलेल्या केमिकलमध्ये तांत्रिक प्रेशर तयार होऊन त्याचा स्फोट झाला. रिअॅक्टरमध्ये १०० टक्के रसायन असते तर, स्फोटाची तीव्रता अधिक भयंकर ठरली असती. २५ टक्के रसायनाचाही स्फोट परिसर हादरवून टाकणारा ठरला. या कंपनीने सुरक्षिततेची उपाययोजना केली नसल्याने ही घटना घडली. त्यामुळे कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या विरोधात ठाणे औद्योगिक न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला जाईल. ही प्रक्रिया किमान महिनाभराच्या कालावधीची आहे.’ दरम्यान, पोलिसही कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.‘घरे, इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करा’एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये यापूर्वीही स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. प्रोबेसच्या स्फोटात दोन हजार जणांच्या मालमत्तांचे नुकसान झाले. त्याची सात कोटी ४२ लाखांची नुकसानभरपाईची रक्कम दिलेली नाही.प्रोबेसनंतर मेट्रो पोलिटीएन कंपनीला भीषण आग लागली होती. त्या वेळी रसायनाच्या साठ्याचे आगीत जळून मोठे स्फोट झाले होते. त्यानंतर सोमवारी अंबर कंपनीत मोठा स्फोट झाला आहे.स्फोटांमुळे घरे व इमारतींना तडे गेलेले आहेत. परिणामी यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमत्र्यांकडे केली आहे.