ठाणे : परदेशी चलनाच्या व्यापारामध्ये महिन्याला १० ते १५ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल एक कोटी २८ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या पंकज तुकाराम बागल (४२, रा. सानपाडा, नवी मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. कोपरी येथील मंगला हायस्कूलच्या मागे असलेल्या मे. स्पाईक ॲण्ड फॉर्च्युन ट्रेडिंग सर्व्हिसेस ही कंपनी दुबई येथे फॉरेन करन्सी ट्रेडिंग करून महिन्याला १० ते १५ टक्के नफा मिळविते, अशी बतावणी केली. या कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतविल्यास त्यावर महिना चार टक्के व्याज परतावा मिळेल, असे भासवून कंपनीचे मालक पंकज बागल यांच्या दुबई येथील कंपनीमध्ये भागीदार असल्याचे सांगून बोरीवलीतील अंजना सुब्रमण्यम यांच्यासह गुंतवणूकदारांची एक कोटी २८ लाख ५० हजारांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा १८ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सध्या ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तो कासारवडवली भागात आला असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, आदींच्या पथकाने पंकजला ताब्यात घेतले.
गुंतवणूकदारांची सव्वाकोटींची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:16 AM