लोकमत न्युज नेटवर्क बदलापूर : बदलापूरच्या सागर इन्हेस्टमेंटमधील गैरव्यवहाराचा तपास जलद गतीने व्हावा, या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वेगाने तपास करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.सागर इन्व्हेस्टमेंटने जास्त व्याजदाराने ठेवी स्वीकारल्या होत्या. या व्याजाच्या आमिषाला बळी पडून दोन हजारांहून अधिक गुंवणूकदारांनी मोठी रक्कम गुंतवली. पण नोटाबंदीचे कारण देत नंतर रकमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरुन सागर इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख सुनिता सुमद्र, सुहास समुद्र आणि त्याचा मुलगा श्रीराम, पत्नी अनघा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सुनिता आणि सुहास यांना पोलिसांनी अटक केली; तर श्रीराम आणि अनघा यांच्या जामिन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरु असतांनाच गुंतवणूकदारांची नेमकी किती रक्कम बुडवण्यात आली, याचा तपास पोलीस करित आहे. मात्र हा तपास पुढे सरकत नसल्याने माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या नेतृत्वाखाली फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी मंत्रालयात गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेतली आणि तपास वेगाने करण्याबाबत त्यांना निवेदन दिले. त्यावर पाटील यांनी तपास योग्य प्रकारे करत त्याला वेग देण्याचे आश्वासन गुंतवणूकदारांना दिले. नंतर गुंतवणूकदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. त्यांनीही तपासाला गती देण्याचे आश्वासन दिले.
गुंतवणूकदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
By admin | Published: July 04, 2017 6:39 AM