- राजू ओढेठाणे : खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला घरचे जेवण आणण्यास ठाण्याच्या विशेष न्यायालयाने नकार दिला.ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे दोन हस्तक आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना सप्टेंबर २०१७मध्ये अटक केली. जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचे तीन गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतही (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी इक्बाल कासकरने घरच्या जेवणासाठी मुभा मागणारी याचिका विशेष मकोका न्यायालयाचे न्या. ए.एस. भैसारे यांच्यासमोर दाखल केली होती. आपणास मधुमेह आणि उच्चरक्तदाब असल्याचा युक्तिवाद करून, या आजारांवर उपचार करणाºया संबंधित डॉक्टरांचे कागदोपत्री पुरावे इक्बालच्या वतीने न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. प्रकृतीचा विचार करून घरचा सकस आहार घेऊ देण्याची परवानगी त्याने न्यायालयाला मागितली. २००३ ते २००७ या काळात अन्य एका गुन्ह्यामध्ये मुंबईच्या कारागृहात बंदिस्त असताना आपणास घरच्या आहारासाठी परवानगी देण्यात आली होती. या सुविधेचा आपण कोणत्याही प्रकारे गैरफायदा घेतला नाही, हेदेखील इक्बालने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.सरकारी पक्षाने इक्बालच्या याचिकेला विरोध दर्शविला. ठाण्याच्या कारागृहात भोजन आणि औषध सुविधा उपलब्ध आहे. तिथे उपाहारगृह आणि बेकरीदेखील आहे. याशिवाय कारागृहातील अन्नाचा दर्जा आपण जातीने तपासला असून, तो चांगला असल्याचे सरकारी पक्षाने या वेळी न्यायालयासमोर स्पष्ट केले. न्यायाधिन कैद्यांच्या अन्नपुरवठ्याबाबत कायदेशीर तरतुदी आहेत. त्यानुसार त्यांना दररोज भोजन, दूध, अंडी दिली जातात. सरकारी पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरले.इक्बाल कासकरला अन्य कोणता गंभीर आजार नाही. आजारांबाबत त्याने संबंधित डॉक्टरांची कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र त्यामध्ये इक्बालला कोणत्या विशेष आहाराची गरज आहे असे कुठेही म्हटले नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने इक्बालची याचिका फेटाळली.कायद्यापेक्षाकुणीही मोठे नाहीकारागृहात कैद्यांसाठी औषधोपचारापासून सर्व सुविधा उपलब्ध असतात. कुण्या एकाची इच्छा किंवा सुविधा तेवढी महत्त्वाची नाही. त्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शिस्त खचितच महत्त्वाची असल्याचे निरीक्षक इक्बाल कासकरची याचिका फेटाळताना न्यायालयाने नोंदविले.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कोर्टाने नाकारले घरचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:38 AM