ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नऊ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी पुन्हा कोठडीत घेतले आहे. न्यायालयाने २१ मेपर्यंत त्याचा ताबा पोलिसांना दिला आहे.ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद व छोटा शकिलचा फायनान्सर पंकज गंगर यांना सप्टेंबर २०१७ मध्ये अटक केली. त्यांच्यावर जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा कासारवडवली येथे, तर दोन गुन्हे ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी ठाणेनगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा गोराई येथील ३८ एकर जागेच्या वादासंदर्भात आहे. २००७ साली आरोपींनी या प्रकरणामध्ये ३ कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. बिल्डरच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी इक्बाल कासकरची पोलीस कोठडी यापूर्वीच घेतली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरूद्ध मकोकाअन्वये गुन्हा दाखल केला. त्यामुळे मकोकाअंतर्गत इक्बालची पोलीस कोठडी घेणे आतापर्यंत बाकी होते. त्यानुसार पोलिसांनी ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयासमोर शुक्रवारी इक्बालची पोलीस कोठडी पुन्हा मागितली. न्यायालयाने २१ मेपर्यंत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले.गोराई येथील खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि छोटा शकिल हेदेखील आरोपी आहेत. या गुन्ह्यातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. मध्यंतरीच्या काळात या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यामुळेच इक्बालला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
इक्बाल कासकर पुन्हा पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 6:07 AM