ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या इक्बाल कासकरसह त्याच्या साथीदारांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे. दोन ते तीन दिवसांत यासाठीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह चौघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर हा पोलीस कोठडीत असून उर्वरित तीन आरोपी १३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात छोटा शकीललाही पोलिसांनी आरोपी केले आहे. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आरोपींविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा आहे. या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरच्या हस्तकांनी खंडणीपोटी १५ लाख रुपयांचे दागिने घेतल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपींची पुन्हा एकदा पोलीस कोठडी घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. इक्बालचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मिळवले आहेत. त्याचे विश्लेषण करणे सुरू आहे. तो कुणाकुणाच्या संपर्कात होता, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याआधारे संशयितांना चौकशीसाठी खंडणीविरोधी पथकामध्ये बोलवले जात आहे. इक्बालच्या संपर्कामध्ये त्याच्या हस्तकांव्यतिरिक्त बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खंडणीतून मिळालेला पैसा त्याने कुठे गुंतवला, याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
इक्बाल कासकरसह टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:13 AM