ठाणे : मुंबई- नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावर सर्रास सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सैयद उर्फ जाफरी (२०, दलखन गाव, खर्डी, ता. शहापूर) आणि शबीर नियामत खान (५२, इगतपुरी) या दोन अट्टल चोरटयांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थाेरात यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या ताब्यातून एका मोटारसायकलसह चार लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने असा पाच लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिवाळी सणाच्या काळात कळव्यातील विठ्ठल मंदिराबाहेर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्यांनी मोटारसायकलवरून पळ काढला हाेता. या जबरी चोरीच्या तपासादरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक थाेरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जितेंद्र कुंवर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक दीपक घुगे, हवालदार रमेश पाटील, शहाजी एडके आणि दादासाहेब दोरकर आदींच्या पथकाने चोरटे पळालेल्या मार्गावरील तब्बल ८० किलोमीटरच्या परिसरात सतत १२ दिवस सीसीटीव्हींची पडताळणी केली. यातील चोरटयाने विनाक्रमांकाची मोटारसायकल आणि डोक्यात हेल्मेट घालून ही जबरी चोरी केल्याने त्याला शोधण्याचे पोलिसांना आव्हान होते. त्यानंतर काही बारकाव्यांच्या आधारे पारसिकनगर, खारेगाव, टोलनाका, कल्याण फाटा वडपे- पडघा, वाशिंद- शहापूर, खर्डी आणि कसाऱ्यापर्यंत आरोपीचा माग काढण्यात आला. या मार्गावरील लहान मोठी दुकानांमधील सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे तसेच खबऱ्यांच्या मदतीने माेहम्मद सलमान या चोरट्यास पोलिसांनी शहापूर तालुक्यातील दळखण गावातून २१ नोव्हेंबर रोजी अटक केली.
चौकशीमध्ये त्याने कळवा, वर्तकनगर आणि कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी केलेले दागिने त्याचा साथीदार शबीर खान याच्याकडे दिल्याचे चाैकशीत उघड झाले. मूळ कल्याणच्या आंबिवलीतील रहिवासी असलेल्या मोहमद शहा उर्फ जाफरी याने शहापूर तालुका, पडघा, भिवंडी तालुका, नारपोली, अंबरनाथ, मालाड आणि रबाळे आदी पोलिस ठाण्यांच्या भागात जबरी चोरी आणि चोरीचे १४ गुन्हे केल्याची कबुली दिली. सलमानच्या माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी जाफरीचा साथीदार खान यास अटक करून त्याच्या ताब्यातून चार लाख २० हजार रुपये किंमतीचे चोरीचे दागिने तसेच एक लाख ५० हजार रुपये किमतीची चोरीची एक मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.