ठाणे: सराईत इराणी टोळीतील सक्रीय म्होरक्या आणि अट्टल सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी (२३, रा. भिवंडी, ठाणे) याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून ३०६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह तीन मोटारसायकली आणि चार मोबाईल असा २३ लाख ८९ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांना आळा घालून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर सहायक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी गुन्हे शाखा अंतर्गत विशेष मोहीम राबवून एक पथक तयार केले होते.
इराणी टोळीतील सक्रीय अट्टल सोनसाखळी चोर अब्बास जाफरी हा भिवंडी परिसरातील इराणी वस्तीमध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ३ जानेवारी २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ताबयात घेण्यात आले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करुन ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या वेगवेगळया पोलिस ठाण्याच्या परिसरात सोनसाखळी जबरी चोरीसह मोटारसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ३०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांसह २३ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये भिवंडीतील तीन, कल्याणचे दोन, उल्हासनगरातील तीन आणि ठाण्यातील ११ गुन्हयांची कबूली त्याने दिली आहे.अब्बास जाफरी यापूर्वीही होता कारागृहातअब्बास याला यापूर्वीही ठाणे गुन्हे शाखेने २०२२ मध्ये सोनसाखळी जबरी चोरीच्या गुन्हयात अटक केली होती. त्याच्यावर त्यावेळी आठ गुन्हे दाखल होते. त्यावेळी तो आठ महिने कारागृहात होता. सुटल्यानंतर त्याने पुन्हा हेच गुन्हे केल्याचे निदर्शनास आल्याचे पाेलिसांनी सांगितले.