जितेंद्र कालेकर ( ठाणे), लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : महिलांच्या गळयातील सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या गुलामअली ऊर्फ नादर सरताज जाफरी (वय ४०, आंबिवली, कल्याण, ठाणे) या सराईत इराणी चोरट्याला जेरबंद केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून सहा जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले असून, ५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
कल्याण परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. टिळकनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीन कल्याण पथकाकडून करण्यात येत असताना यातील संशयित आरोपी त्याच्या आंबिवलीतील घरी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे जाफरी याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत टिळकनगर भागातील जबरी चोरीमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती उघड झाली. चौकशीमध्ये त्याचा साथीदार नूर अब्बास जाकीर (रा. आंबिवली, कल्याण) याच्या मदतीने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. जाफरी याच्याकडून कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळातील सोनसाखळी जबरी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले.