भिवंडी : जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, परदेशातील अनेक वस्तूंच्या आयात-निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर परिमाण झाला आहे. विशेष म्हणजे, भिवंडीतील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीत परदेशातून आणलेले जुने मास्क धुऊन पुन्हा या मास्कची विक्री करण्याची घटना शनिवारी समोर आली असतानाच आता इराण येथून कांदा भिवंडीत दाखल झाला आहे.
खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मीठपाडा परिसरातील आसरा हॉटेलच्यामागे असलेल्या एका बंद यंत्रमाग कारखान्यात हा कांदा साठवला आहे. विशेष म्हणजे, या सडक्या कांद्याचा आकार मोठा असून या कांद्याला आता कोंब फुटले आहेत. तर कांदा सडत चालल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हा कांदा सात ते आठ दिवसांपासून येथे साठवला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सोमवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरपीआय सेक्युलरचे मीठपाडा शाखा अध्यक्ष आकाश साळुंके यांना हा प्रकार समजल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा कांदा इराणहून आला असल्याची माहिती त्यांना या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाºयाने दिली. त्याचबरोबर हा कांदा परेश मेहता या व्यापाºयाचा असून त्याने मीठापाडा येथील पवन शेठ या कारखाना मालकाच्या कारखान्यात ८० टन कांदा साठवून ठेवला आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापक रियाज अली याने दिली. निजामपुरा पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे.