कल्याण- येथील जुना पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवजड वाहने वाहतूक करताना दिसून येत आहे. त्यामुळे या पुलावरील एका दिशेला लोखंडी बार आडवा टाकण्यात आला होता. या लोखंडी बारला एका मालवाहतूक गाडीने जोराची धडक दिल्याने हा बार खाली पडला. सध्या हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला आहे. त्यामुळे, जर एखादे हलके वाहन वाहतूक करत असते तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेचा ढिसाळपणा उघड झाला आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील रेल्वे मार्गावर जुना पत्री पूल आहे. हा पूल धोकादायक असल्याने अवजड वाहतुकीसाठी तो बंद करण्यात यावा, असे मध्य रेल्वेने महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळास कळविले होते. तसेच वाहतूक पोलिसांनीही याबाबत कळविण्यात आले होते. कल्याण पत्री पूलावरुन अवजड वाहनांसाठी पहाटे सहा ते रात्री दहा या वेळेत वाहतूक बंदी असताना त्यावरुन सर्रासपणे वाहतूक केली जात होती. वाहतूक पोलीस नसल्यावर अवजड वाहने डोळा चुकवून जुन्या पत्रीपूलावरुनच मार्गक्रमण करीत असल्याच्या तक्रारी वारंवार वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी नेतीवलीच्या दिशेने कल्याण स्टेशनकडे येताना अवजड वाहनांकरीता अडथळा तयार करण्यासाठी भला मोठा लोखंडी बार टाकला होता. हा बार दोन वेळा पडला. त्यानंतर आज पुन्हा दुपारी 2 वाजता हा बार खाली पडला. लाकडाने भरलेल्या जड वाहनाने या बारला धडक दिल्याने हा बार पडला. जुन्या पत्री पुलावरुन अवजड वाहनांसाठी बंदी असली तरी हलक्या वाहनांना येथून प्रवेश दिला आहे. त्यामुळे, बार पडला तरीही हलकी वाहने मार्गक्रमण करीत होती. अर्धवट अवस्थेत पडलेला बार दूर हटविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे पाहून त्याठिकाणाहून महापालिकेच्या दिशेने येत असलेले विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी बार कोणाच्या अंगावर, वाहनावर पडू नये यासाठी तो दूर हटविण्याकरीता वाहतूक पोलीस, वार्डन व नागरिकांच्या मदतीने दूर केला आहे.
जुन्या पत्रीपुलावर लावलेला लोखंडी बार पडला, विरोधी पक्ष नेता उचलण्यास धावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 6:06 PM