ठाणे : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीतील ६५ वर्षीय सूत्रधार महिलेसह सात जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने जेरबंद केले असून त्यांच्यासह ११ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील चौघे जण अद्यापही पसार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.टोळीप्रमुख शेराबी सय्यद (६५), फिजा शेख (३०), वसीम ऊर्फ पिंचोटी फिरोज इराणी (२५), सादकअली सय्यद (३०), मेहंदी सय्यद (२८), कासीम इराणी (१९) आणि सादीक ऊर्फ साधू शहाजमान इराणी (३०) सर्व रा. आंबिवली, कल्याण, जि. ठाणे अशी याप्रकरणी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी डोंबिवली पूर्व भागातील छेडा रोड भागात ५३ वर्षीय महिला पायी जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यावर जोरदार थाप मारून त्यांच्या गळ्यातील एक अडीच तोळे वजनाची सोनसाखळी आणि एक साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र असा एक लाख ८५ हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरीविरोधी पथकाच्या कल्याण युनिटने वसीम फिरोज इराणी, रा. आंबिवली याला अटक केली होती. त्याच्याकडून ७५ हजारांची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हस्तगत केली होती. अधिक चौकशीत आंबिवली इराणी वस्ती परिसरातील बलुची गुन्हेगारांच्या संघटित टोळ्या सोनसाखळी चोरीसाठी बळाचा आणि प्रसंगी हिंसाचाराचाही वापरकरतात. वरील सहा जणांना २७ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे. त्यांना मोक्का न्यायाधीश भैसाणे यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
इराणी टोळीतील सोनसाखळी चोरांना मोक्का
By admin | Published: November 02, 2015 1:25 AM