- सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा व मनपाचे दुर्लक्ष यामुळे शहरातील विविध विभागांना अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पाणीटंचाई भेडसावत आहे.
मनपा हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी असतानाही मनपा स्वतःची पाणीपुरवठा योजना उभी करू शकली नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. शहराची लोकसंख्या सहा लाख गृहीत धरल्यास, त्या प्रमाणात फक्त ९० ते ९५ एमएलडी पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात दररोज १६० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे. दररोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तरीही शहरात पाणीटंचाई भासत आहे.
शहरातील पाणीटंचाई, गळतीची समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने काही वर्षांपूर्वी ४५० कोटींची पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकल्या असून, ११ उंच व एक भूमिगत जलकुंभ उभारले आहे, तसेच नियमित व समान पाणीपुरवठा होण्यासाठी पम्पिंग स्टेशन उभारले आहे. दरम्यान, शहाड गावठाण येथील एमआयडीसीचा पाणीपुरवठा पंप मशीन व साठवण टाक्या ताब्यात घेऊन तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही.
३० टक्के पाणी वाया
शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, गळती थांबविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी मनपाने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, आज जलवाहिन्यांना गळती लागली असून, ३० टक्के पाणी वाया जात आहे. कोट्यवधींची पाणी वितरण योजना राबविल्यानंतरही, नवीन जलवाहिन्या टाकण्यावर कोट्यवधींचा खर्च पालिका करीत आहे. पाणी बिलापोटी मनपा वर्षाला २५ कोटींचा खर्च करीत आहे.
५५ हजार पाणी मीटर गेले कुठे
शहरात ४५० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली असून, या योजनेत ५५ हजार पाणी मीटर बसविले, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात शहरात मीटरविना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ५५ हजार मीटर गेले कुठे, अशी ओरड सुरू झाली. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन ते तीन वेळा, तर झोपडपट्टी भागात दिवसाआड पुरवठा होत आहे.