ठाणे : ठाणे महापालिकेकडून नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. नालेसफाईकडे ठेकेदारांनी पाठ फिरविली आहे, त्यामुळे महापालिकेकडून निविदेला वांरवार मुदतवाढ दिली जात आहे. तरीसुध्दा ठेकेदार अद्यापही मिळू शकलेले नाहीत. त्यात शनिवारी आमदार संजय केळकर यांनी कोलशेत येथील नाल्याची पाहणी केली असता, हा नाला आहे की रस्ता शोधून दाखवा अशी टीका या नाल्याकडे पाहून केली आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई वेळेत सुरु झाली नाही तर मात्र ठाण्यांची तुंबई होणार असल्याचे चित्र या निमित्ताने निर्माण झाल आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी पावसाळा सुरु झाला तरी सुध्दा नालेसफाई सुरु असल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु यंदा नालेसफाई वेळेत व्हावी यासाठी महापालिकेने मार्च महिन्यातच तयारी सुरु केली होती. त्यानुसार नालेसफाईसाठी सुमारे ८ कोटींची तरतूद करुन निविदा देखील काढल्या आहेत. परंतु वारंवार मुदतवाढ देऊनही ठेकेदार नालेसफाई करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नालेसफाईसाठी असलेला निधी कमी केल्याने आणि मागील वर्षीच्या नालेसफाईची बिले अद्यापही अदा करण्यात न आल्याने, ठेकेदारांनी असहकार पुकारला आहे. सध्या वागळे, लोकमान्य आणि वर्तकनगरलाच ठेकेदार मिळाले असून उर्वरीत सहा प्रभाग समितीला ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता नालेसफाईची कामे करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे.
एकीकडे शहरात स्वच्छता मोहीम राबिवली जात असतांना दुसरीकडे नालेसफाई अद्यापही सुरु झालेली नसल्याने पावसाळ्याच्या आधी नालेसफाईच्या कामाला सुरवात झाली नाही तर मात्र स्वच्छता मोहीमेचा देखील नाले बोजवारा उडवतील असा चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग, अमरा समोर जो नाला आहे त्याची साफसफाई अजून झाली नाही. याबाबत येथील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तातडीने या नाल्याची पहाणी केली. यावेळी नाला बघितल्यावर हा नाला आहे की रस्ता...ओळखा..? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे. शिवाय येथील एस टी पी प्लान्ट बिघडलेला आहे. या बाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला असून या नाल्याच्या दुगंर्धीचा त्रास येथील गृहसंकुलातील लोकांना होत असून आजार पसरले आहेत. या नाल्यात अनेक प्रकारचे प्लास्टिक असून लवकरात लवकर महापालिकेने हा नाला साफ करावा अशा सुचना त्यांनी अधिकाºयांना केल्या आहेत. परंतु नालेसफाईच्या कामांना ठेकेदाराच मिळत नसल्याने नाल्यांची सफाई होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.