ठाणे : गुवाहाटी येथे ११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या ३७ वी राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ईशा नेगीने रौप्य पदक पटकावले. ती ठाणे महापालिकेच्या प्रशिक्षण केंद्रातून सराव करीत आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर प्रशिक्षण घेत असलेल्या ईशाने तिच्या वर्षातील दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत २० वर्षांखालील महिलांमध्ये ४०० मीटर अडथळा शर्यतीत मोठ्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक मिळवले. मिहिका सुर्वे १४ वर्षाखालील मुलींच्या ट्रायथलॉनमध्ये टॉप सहामध्ये स्थान मिळवू शकली. ईशा म्हणाली की, “मी राष्ट्रीय स्तरावर ४०० मीटर एरा हर्डलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे.
मागच्या वेळी मला हवे तसे परफॉर्म करता आले नाही पण यावेळी मला ते चुकवायचे नव्हते. माझ्या प्रशिक्षकाच्या उपस्थितीने माझ्या कामगिरीत मोठा फरक पडला. मी प्राथमिक फेरीत आणि अंतिम फेरीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करू शकले म्हणून मी आनंदी आहे. मला माझ्या पालकांचे आभार मानायला हवे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की मी हे करू शकते". मिहिकाने सांगितले की, ‘स्पर्धा सर्वोच्च पातळीची होती.
मला पुढच्या वेळेसाठी स्वतःला अजून तयार करायचे आहे.” यावेळी प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी त्यांच्या खेळाडुंचे कौतुक केले. ते म्हणाले की, “ईशा खूप मेहनती मुलगी आहे. गेल्या वेळी राष्ट्रीय स्पर्धेतही ती पदक जिंकण्याच्या अगदी जवळ होती. यावेळी ईशाने आमचा प्लॅन उत्तम प्रकारे अंमलात आणला. वैयक्तिक सर्वोत्तम करणे हे माझे ध्येय आहे आणि तिने दोन्ही शर्यतींमध्ये तेच केले. मिहिका आणि निखिल यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी थोडे अधिक काम करावे लागेल.”